शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान हरकतींचा सिलसिला सुरू झाला आहे. अशातच प्रभाग क्रमांक १४ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निखिल दळवी यांनी महत्त्वाची हरकत नोंदवत सर्व उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रांची सखोल शहानिशा करण्याची मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधून विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून, त्यापैकी काही उमेदवारांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे संशयास्पद असल्याचा दावा निखिल दळवी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतेही बनावट किंवा नियमबाह्य प्रमाणपत्र वापरून निवडणूक लढवली जात नाही ना, याची काटेकोर तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि संविधानिक चौकटीत पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र ही उमेदवारीसाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असून, त्यामध्ये कोणतीही त्रुटी अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी ठाम भूमिका दळवी यांनी मांडली आहे.
तसेच सामान्य मतदारांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहावा यासाठी प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या हरकतीची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १४ मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान सुरू झालेल्या हरकतींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसांत निवडणूक प्रक्रियेत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


