शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून, सरिताताई साने यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरिताताई साने या प्रभाग क्रमांक १५ मधील एक सक्षम, अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गेल्या अनेक वर्षांत महिलांसाठी विविध उपक्रम, आरोग्य शिबिरे, गरजू नागरिकांना मदत, स्वच्छता मोहिमा, तसेच स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे प्रभागातील अनेक समस्या मार्गी लागल्या असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे.
याआधी अनेक वर्षे त्या शिवसेनेच्या शहर संघटिका म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात सक्रियपणे कार्यरत होत्या. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, तळागाळातील संपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. मात्र आज अचानक त्यांनी शिवसेनेपासून वेगळा निर्णय घेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग क्रमांक १५ मध्ये बळ मिळाल्याचे मानले जात असून, आगामी निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सरिताताई साने यांनी “प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी दिशा देण्यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना गोटात खळबळ उडाली असून आगामी काळात आणखी काही राजकीय हालचाली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभाग क्रमांक १५ मधील लढत आता अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


