शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्रमांक २८ हा शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि लक्षवेधी मतदारसंघ ठरत आहे. या प्रभागातील चारही जागांसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थेट सामना रंगणार असून, त्यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रभागात प्रत्येक जागेसाठी भाजपच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादीचा थेट प्रतिस्पर्धी असून, सर्वच उमेदवार स्थानिक पातळीवर परिचित आणि सक्रिय असल्याने निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.
जागा क्रमांक १
भाजपकडून विद्यमान नगरसेवक व शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे मैदानात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेश गणेश काटे आहेत. गेल्या कार्यकाळात विविध विकासकामे, रस्ते, नागरी सुविधा आणि पायाभूत प्रकल्प राबविल्याचा दावा भाजप उमेदवारांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून बदलाचा सूर लावण्यात आला आहे.
जागा क्रमांक २
या जागेसाठी भाजपच्या अनिता संदीप काटे आणि राष्ट्रवादीच्या शीतल नाना काटे यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय राहिल्या असून, महिला मतदारांमध्ये या लढतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
जागा क्रमांक ३
भाजपच्या कुंदा भिसे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या मीनाक्षी अनिल काटे मैदानात आहेत. या लढतीत सामाजिक कार्य, आरोग्यविषयक उपक्रम आणि तळागाळातील कामांचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांचा परिसरात चांगला जनसंपर्क असल्याने ही लढतही अटीतटीची ठरणार आहे.
जागा क्रमांक ४
या जागेसाठी भाजपचे संदेश काटे आणि राष्ट्रवादीचे विठ्ठल (नाना) काटे यांच्यात सामना होणार आहे. पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक संपर्क या मुद्द्यांवर ही निवडणूक प्रामुख्याने लढवली जाणार आहे.
विकास विरुद्ध दैनंदिन प्रश्न अशी लढत
प्रभाग २८ मधील प्रचारात दोन वेगवेगळे मुद्दे ठळकपणे पुढे येताना दिसत आहेत. भाजपकडून मागील दहा वर्षांतील विकासकामांचा आढावा मांडण्यात येत असून, लिनिअर गार्डन, रस्त्यांची कामे, नागरी पायाभूत सुविधा यांचा विशेष उल्लेख केला जात आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, दैनंदिन नागरी समस्या, देखभाल-दुरुस्तीतील त्रुटी या मुद्द्यांवर भर देत “स्थानिक प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद देणारा पर्याय” म्हणून स्वतःला सादर केले जात आहे.
निकालाकडे सर्वांचे लक्ष
निवडणुकीची तारीख जवळ येत असताना प्रचाराचा जोर वाढत असून, प्रभाग क्रमांक २८ मधील ही लढत पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीच्या लढतींपैकी एक ठरणार, हे निश्चित आहे.


