शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ (OBC महिला) मधून किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकासनगर व गुरुद्वारा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “हा लढा सत्तेसाठी नाही, तर प्रभाग क्रमांक १६ च्या सक्षम, सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा निर्धार आहे. जनतेच्या विश्वासाची ताकद आणि सेवाभावाची ओळख हीच माझी खरी ओळख आहे.”
अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रभागातील मूलभूत सुविधा सक्षम करणे, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा तसेच महिलांसाठी सुरक्षित व सक्षम वातावरण निर्माण करणे हे आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचे ऐश्वर्या तरस यांनी स्पष्ट केले. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, खेळाची मैदाने, उद्याने व सार्वजनिक सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“प्रभागातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवणारी, कायम लोकांमध्ये राहणारी प्रतिनिधी म्हणून काम करेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.



