बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न, सुमारे ८० उमेदवारांना अधिकृत उमेदवारी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक इच्छुक उमेदवार असलेल्या भारतीय जनता पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी यंदा वेगळी रणनीती अवलंबली आहे. सोमवारी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना अर्जासोबत आवश्यक असलेले पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म वाटप करण्यात आले. भाजपकडून सुमारे ८० उमेदवारांना हे फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी तसेच आमदारांच्या माध्यमातून मध्यरात्रीपासूनच इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधण्यात आला. संबंधित उमेदवारांना सकाळी तातडीने अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रक्रियेत सुमारे ९० ते १०० उमेदवारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, भाजपने यंदा २०१७ मध्ये इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्या अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी लाटेत निवडून आलेल्या या नगरसेवकांकडून गेल्या पाच वर्षांत प्रभागात अपेक्षित विकासकामे न झाल्याचे पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही नगरसेवकांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने पक्षाने त्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नाराज इच्छुक आणि माजी नगरसेवकांनी आता पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसलेनगर येथील निवासस्थानी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. एबी फॉर्म न मिळाल्याने तसेच आपल्या जागेवर अन्य उमेदवारांना संधी दिल्याने नाराज झालेल्यांनी थेट पवारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.
तसेच काही इच्छुकांनी शिवसेनेतील महायुतीच्या जागावाटप प्रक्रियेत सहभागी असलेल्या पुण्यातील नेत्यांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत हालचाली आणि राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.


