शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चारही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात अत्यंत उत्साहात, नागरिकांच्या उपस्थितीत व सन्मानपूर्वक दाखल करण्यात आले. यामध्ये सिद्धार्थ बनसोडे, राहुल भोसले, वैशाली घोडेकर आणि सारिका मासुळकर यांनी अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी, जल्लोष आणि सकारात्मक वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करत प्रभागातील विकासाचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सातत्याने केलेला जनसंपर्क, सामाजिक कार्याची भक्कम शिदोरी आणि नागरिकांनी दाखवलेला अमूल्य विश्वास या बळावर आता प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, महिला व युवकांसाठी उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
“हा लढा केवळ एका उमेदवाराचा नाही, तर प्रभाग क्रमांक ९ मधील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा, सन्मानाचा आणि विकासाचा आहे. जनतेचा विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद असून, सर्वांना सोबत घेऊन प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा इतिहास घडवू,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत, पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळात प्रभाग क्रमांक ९ हा आदर्श, सुव्यवस्थित व नागरिकाभिमुख प्रभाग म्हणून विकसित करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.


