शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१-ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संदीप वाघेरे यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना संदीप वाघेरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. मूलभूत सुविधा सक्षम करणे, स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करणे, दर्जेदार रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुविधा अधिक बळकट करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. “लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत प्रामाणिकपणे काम करणे, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे आणि प्रभागाचा समतोल विकास घडवून आणणे हेच माझे ध्येय आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून तसेच जनतेच्या प्रेम, आशीर्वाद व सहकार्याच्या बळावर ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडू, असा आत्मविश्वासही संदीप वाघेरे यांनी व्यक्त केला. आगामी काळात प्रभाग क्रमांक २१-ब हा आदर्श व सुविधायुक्त प्रभाग म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी नागरिकांसमोर मांडला आहे.


