थेरगावमध्ये भाजपकडून शक्तीप्रदर्शन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनिषाताई प्रमोद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात हा अर्ज सादर करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी थेरगाव परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या रॅलीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, बूथप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागात भाजपच्या उमेदवारीला मोठे जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
मनिषाताई पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्रभाग क्रमांक २३ चा सर्वांगीण, संतुलित आणि दीर्घकालीन विकास हाच माझा मुख्य उद्देश आहे. मूलभूत सुविधा मजबूत करणे, नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवणे आणि पारदर्शक कारभार देणे यासाठी मी कटिबद्ध आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पाणीपुरवठा सुरळीत करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा निचरा, स्वच्छता व्यवस्था बळकट करणे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये, उद्याने व खेळाच्या मैदानांचा विकास, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, आरोग्य सेवा, अंगणवाडी व शाळांच्या सुविधा, सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईटद्वारे सुरक्षितता वाढवणे, तसेच युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख उपक्रम राबवणे यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनिषाताई पवार यांना शुभेच्छा देत प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल होताच प्रचाराला वेग आला असून घराघरांत जाऊन संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपकडून संघटित ताकद, व्यापक जनसमर्थन आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन मनीषाताई प्रमोद पवार निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.


