spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्रे पिंपरीत दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आले आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम यंत्रांचा समावेश आहे. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यामध्ये, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार पिंपरी येथे आणण्यात आले.

या संपूर्ण कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील व इंद्रजीत जाधव यांच्या समन्वयाने सुमारे २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन व १६ सशस्त्र पोलिस कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये ही सर्व ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक राजकीय पक्षांचे नियुक्त पदाधिकारी यांना पुर्वसुचना देऊन नियमानुसार पाहणीसाठी बोलविण्यात आले होते.

सर्व वाहनांच्या सीलबंद स्थितीची उपस्थित पोलिस अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष खातरजमा करून सील उघडण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रे स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद, सत्वशील शितोळे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षितरीत्या उतरविण्यात आली. सध्या सर्व ईव्हीएम यंत्रे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सीलबंद स्थितीत सुरक्षित ठेवण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!