कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते सागर कोकणे यांच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, नुकतेच त्यांच्या २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २७ मधून निवडणूक लढविण्याची तयारी सागर कोकणे यांनी सुरू केली असून, त्यानुसार त्यांनी प्रचारालाही गती दिली आहे. गाठीभेटी, घराघरात संपर्क, विविध सामाजिक उपक्रम आणि नावीन्यपूर्ण प्रचार पद्धतीमुळे त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दिनदर्शिकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा तसेच जनतेशी सतत संपर्कात राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही दिनदर्शिका केवळ तारखा दाखवणारी नसून, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी रचना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रकाशनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सागर कोकणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, तरुण नेतृत्वाला संधी मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा, नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सागर कोकणे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी “प्रभाग २७ चा विकास हाच ध्यास” या भूमिकेवर ठाम राहून आगामी निवडणुकीत सागर कोकणे यांना ताकद देण्याचा निर्धार व्यक्त केला. दिनदर्शिकेच्या प्रकाशनानिमित्त एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


