शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १५ मधून सरिताताई साने यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेताना दिसत आहे. प्रचारात त्यांनी आघाडी घेतली असून, मतदारांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण प्रभागात दिसून येत आहे.
सरिताताई साने या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असून, घरोघरी भेट देत मतदारांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडासुविधा यासारख्या मुद्द्यांवर मतदारांशी सविस्तर संवाद साधत आहेत.

प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत असून, “आपली माणूस, आपल्या हक्कासाठी लढणारी उमेदवार” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
आज प्रभाग क्रमांक १५ मधील सेक्टर नंबर २६, निगडी प्राधिकरण परिसरात त्यांचा जोरदार प्रचार झाला. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सरिताताई साने यांना पाठिंबा दर्शवला. नागरिकांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या असता, त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी दिला.

“विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य” हेच आपले धोरण असल्याचे सांगत, निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार सरिताताई साने यांनी व्यक्त केला. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, महिला-सक्षमीकरण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ठोस काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकंदरीतच प्रभाग क्रमांक १५ मध्ये सरिताताई साने यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत त्या मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.


