spot_img
spot_img
spot_img

भोसरीत पादुका दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न

२२ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अद्वितीय संगम साधणारा ‘ऊर्जास्पर्श’ पादुका दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २२ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भारतातील नामवंत नऊ संत, महंत व शक्तिपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडवून आणण्यात आले. प्रभाग क्रमांक ७ मधील दत्त मंदिर, लांडेवाडी, भोसरी येथे गुरुवारी (दि. २४) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा भव्य आध्यात्मिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते विराज विश्वनाथ लांडे यांनी केले होते. भोसरी विधानसभेचे पहिले आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. दर्शनासोबतच महाप्रसाद व सामूहिक भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात प्रभू श्रीराम (चित्रकूट) प्रासादिक पादुका, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) आणि प.पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भाविकांनी घेतले.

संत-महंतांनी दाखवलेल्या भक्ती, सेवा, त्याग, समता आणि सदाचाराच्या मार्गाची अनुभूती या सोहळ्यातून मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. भोसरीत आयोजित हा पादुका दर्शन सोहळा भाविकांच्या मनावर ठसा उमटवून गेला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!