शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथे अनिता ताई संदीप काटे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यांच्या प्रचारार्थ संदीप विठ्ठल काटे यांनी परिसरातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन सखोल संवाद साधला. घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा आढावा घेत त्यांनी विकासाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
या संवादादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, उद्याने, महिलांच्या सुरक्षिततेसह युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा यांसारख्या विविध मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी अनिता ताई काटे कटिबद्ध असल्याचे संदीप काटे यांनी सांगितले.

पिंपळे सौदागर परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास, पारदर्शक प्रशासन, नागरिकाभिमुख कामकाज आणि सातत्याने संपर्कात राहणारे नेतृत्व देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “विकास हीच खरी ओळख” या भूमिकेतून प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने या संवादात सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ मधून अनिता ताई संदीप काटे यांना सक्षम, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.


