शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने राष्ट्रीय कला उत्सव २०२५ मध्ये उत्स्फूर्त आणि लक्षवेधी सहभाग नोंदवला. या भव्य उत्सवाची सुरुवात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “महाराष्ट्राची लोकधारा” या बहारदार नृत्यप्रकाराने करण्यात आली.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्यात भूपाळी, वारकरी दिंडी, जोगवा, गोंधळ,कोळी , शेतकरी,पोवाडा आदी लोकनृत्य प्रकारांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणासाठी प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वर्षा निगडे आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रतिभा महाविद्यालयाचे ,विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. या संपूर्ण यशाबद्दल कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा,खजिनदार डॉ भूपाली शहा,संस्थेच्या संचालिका डॉ तेजल शहा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या.
राष्ट्रीय पातळीवरील या कला उत्सवात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने सादर केलेली “महाराष्ट्राची लोकधारा” ही कला आणि संस्कृती जपण्याची प्रेरणादायी झलक ठरली असून, कॉलेजच्या सांस्कृतिक परंपरेला नवा मान मिळवून दिला आहे.


