शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते निहाल आझमभाई पानसरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
निहाल पानसरे हे शहरातील ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे यांचे सुपुत्र असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते सक्रिय मानले जातात. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात झालेल्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आजमभाई पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत निहाल पानसरे यांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश हा शरदचंद्र पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत राजकारण तापले असून, येत्या काळात याचे पडसाद महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


