शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर परिसरात अनिताताई संदीप काटे यांनी विविध भागांत नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत जनसंवाद साधला. यावेळी घरोघरी जाऊन परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी अनिताताईंना औक्षण करून आपुलकीने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी तसेच युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. थेट संवादातून परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक समस्या, आरोग्य सुविधा, उद्यानांची देखभाल, स्ट्रीट लाईट व सुरक्षेचे प्रश्न नागरिकांनी मांडले.

नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व भावना मनापासून ऐकून घेत प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, तसेच प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अनिताताई संदीप काटे यांनी यावेळी स्पष्ट केले. “लोकप्रतिनिधी म्हणून केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून प्रश्न सोडविणे हेच आपले ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छ व सुंदर प्रभाग, दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन यावर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर परिसर अधिक विकसित, सुरक्षित व सुविधा-संपन्न करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या जनसंपर्क दौऱ्याला परिसरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


