spot_img
spot_img
spot_img

विशाल काळभोर यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात घडामोडींना वेग येत असतानाच शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते विशाल काळभोर यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे काळभोर नगर परिसरात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकारण चांगलेच तापले असून, विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार संधीच्या शोधात पक्षांतर करताना दिसत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी भाजपाने २२ उमेदवारांना पक्षात प्रवेश दिल्याने शहरात विरोधी पक्ष उरेल की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना प्रवेश देत राजकीय समतोल साधल्याचे चित्र आहे. येत्या काळात विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवक व नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचेही सांगितले जात आहे.

विशाल काळभोर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\

 

यावेळी प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले,
“विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आवाज असून विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगती हेच आमच्या राजकारणाचे केंद्र आहे. या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नवीन सहकाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमताचा उपयोग जनतेच्या हितासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी आणि लोकाभिमुख राजकारणासाठी नक्कीच होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

एकूणच, विशाल काळभोर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!