शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात आज मोठा उलटफेर घडणार आहे. माजी नगरसेवक आणि प्रभावशाली नेते राहुल कलाटे आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या हाय व्होल्टेज प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.
भाजप प्रवेशासाठी राहुल कलाटे मुंबईकडे रवाना झाले असून, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सर्व अंदाजांना छेद देत कलाटे यांनी थेट भाजपची वाट निवडली आहे. प्रभाग क्रमांक 24, 25 आणि 26 मध्ये कलाटे यांचा मोठा जनाधार व प्रभाव असून, त्यांच्या या निर्णयामुळे त्या भागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
या प्रवेशामागील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी कलाटे यांच्या प्रवेशासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे नकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, या दोन्ही आमदारांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कलाटे भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहर भाजपात अंतर्गत हालचालींना वेग आला असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आज होणारा हा सर्वाधिक चर्चेत असलेला हाय व्होल्टेज प्रवेश पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला नवी दिशा देणार हे मात्र निश्चित आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद स्पष्टपणे उमटणार, यात शंका नाही.


