शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २७ मधील श्रीनगर परिसरात राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व सागर कोकणे यांच्या पुढाकाराने महिला बचत गटांचा भव्य महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महिलांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून महिलाशक्तीचे एकजूट दर्शन घडवले.
या महामेळाव्याच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा आणि स्वयंरोजगार या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक माहिती, कौशल्यविकासाच्या संधी, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या योजनांची माहिती देत स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन झाले.
महिला सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर उपस्थित मान्यवरांनी ठोस भूमिका मांडली. महिला सुरक्षित अभियान प्रभाग क्रमांक २७ मध्ये अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढील कार्यपद्धतीवर चर्चा झाली. या चर्चासत्रातही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
या मेळाव्यातून महिलांनी एकत्र येत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाम पाठिंबा जाहीर केला. प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी महिलांनी दर्शविल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महिला बचत गटांच्या संघटनात्मक ताकदीमुळे हा प्रतिसाद केवळ उपस्थितीपुरता न राहता, विकासाभिमुख राजकारणाला बळ देणारा ठरत असल्याचे चित्र दिसून आले.
एकूणच, श्रीनगर परिसरातील हा महामेळावा महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश देणारा ठरला. महिलांना माहिती, आत्मविश्वास आणि संघटनशक्ती मिळाल्याने प्रभाग २७ मध्ये सामाजिक व विकासात्मक घडामोडींना नवी दिशा मिळेल, असा विश्वास सागर कोकणे यांनी व्यक्त केला.


