विकासासाठी ठाम संकल्प
शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंद्रायणीनगर परिसरातील प्रत्येक कुटुंबाकडून मिळणारा विश्वास, प्रेम आणि आपुलकी हाच आपल्या सामाजिक-राजकीय कार्याचा खरा आधार असल्याचे मत तुषार सहाणे यांनी व्यक्त केले. जनतेच्या आशीर्वादाने आणि सक्रिय साथीनं परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा आपला ठाम संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तुषार सहाणे यांना प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इंद्रायणीनगरमधील विविध भागांत जागोजागी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत असून, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना विशेष पाठिंबा लाभत आहे.
प्रचारादरम्यान त्यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांचा आढावा घेतला. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, आरोग्य सुविधा, शिक्षणाचा दर्जा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. “रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगलं आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांसाठी सुरक्षितता व सक्षम सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व सामाजिक आधार व्यवस्था मजबूत करण्यावर आपला भर राहील, असेही तुषार सहाणे यांनी नमूद केले. केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करत, “जनतेचा विश्वास हाच आमचा खरा विजय आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगरमध्ये सुरू असलेला हा जनसंवाद आणि वाढता पाठिंबा पाहता, प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


