spot_img
spot_img
spot_img

दोन दिवसीय प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी व कायदेशीर नियमावलीवर सविस्तर मार्गदर्शन

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी देण्यात आलेले सर्व साहित्य नीट तपासून घेणे आवश्यक – उपायुक्त पंकज पाटील

शबनम न्यूज

पिंपरी, :  लोकशाही प्रक्रियेत मतदान  हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांची रचना व व्यवस्था योग्य पद्धतीने असणे आवश्यक असते. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी देण्यात आलेले सर्व साहित्य नीट तपासून घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५–२६ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदानाशी संबंधित सर्व नियम व कार्यपद्धती समजून घ्या. मतदान प्रक्रिया अचूक व सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजचे प्रशिक्षण नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन उपायुक्त पंकज पाटील यांनी केले.
आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना उपायुक्त पंकज पाटील बोलत होते.

तीन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणामध्ये प्रथम सत्रात आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तर द्वितीय सत्रात प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षणही अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, अविनाश वाळुंज यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपायुक्त पंकज पाटील म्हणाले की, प्रशिक्षणादरम्यान १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळा, मॉक पोल प्रक्रिया, ईव्हीएम तपासणी, मतदानानंतरची कार्यवाही, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार मतदान, नोटा पर्याय तसेच दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठीच्या सुविधांची माहिती उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांना दिली.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५–२६ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या अचूकतेने आणि नियमानुसार पार पाडणे अत्यावश्यक आहे. मतदान केंद्रावर होणारी प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक व नोंदवहीनुसार असावी, मतदान केंद्रावरील शिस्त, शांतता आणि प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देत प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले.तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना दक्षतेने काम करण्याचे देखील उपायुक्त पंकज पाटील यांनी सूचित केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर आणि निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाद्वारे निवडणूक प्रक्रियेबाबत सर्वंकष माहिती देण्यात आली. मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर व अविनाश वाळुंज यांनी मतदान केंद्रावरील कामकाजाची सविस्तर माहिती दिली. ईव्हीएम प्रात्यक्षिकासाठी आयटीआयचे जितेंद्र काथवटे, अरुण वाबळे, प्रवीण कोळेकर आणि योगेश गरड यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण सत्रात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूक कायदा १९५१ अंतर्गत असलेल्या जबाबदाऱ्या, अधिकार व कर्तव्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असल्याने त्या अनुषंगाने मतदान केंद्राची तयारी, मतदान यंत्रांची (EVM) तपासणी, मॉक पोलची प्रक्रिया, मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही याबद्दल देखील यावेळी माहिती देण्यात आली. तसेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार चार जागांसाठी मतदान होणार असून, प्रत्येक मतदाराने चार उमेदवारांना मतदान करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विविध रंगांच्या रिंग असलेल्या मतपत्रिकांच्या वापराबाबत, नोटा (वरीलपैकी एकही नाही) या पर्यायाबाबत आणि अंध व दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या विशेष सुविधांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
तीन सत्रांत पार पडलेल्या या प्रशिक्षणात पहिल्या सत्रात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची पूर्वतयारी, निवडणूक कायदा व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात ईव्हीएम यंत्रांच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून यंत्र हाताळणीची सखोल माहिती देण्यात आली. तिसऱ्या सत्रात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. या प्रशिक्षणामुळे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळून आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!