शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण १ (निवडणूक नियम) मधील नियम क्रमांक ८ अन्वये, क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का-५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती उमेदवारांना मिळावी, या उद्देशाने प्रशासनाकडून एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव (पिन – ४११०३३) येथे होणार आहे.
या बैठकीस संबंधित प्रभागांमधील सर्व राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील नियम, नामनिर्देशनासंबंधी अटी, कागदपत्रे व वेळापत्रक याबाबत स्पष्टता मिळण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


