spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजप–राष्ट्रवादी महायुतीचे वर्चस्व

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीने स्पष्ट वर्चस्व निर्माण केले आहे. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांनी तब्बल ९ हजार ७९५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी दोन्ही अपक्ष उमेदवारांचा दारुण पराभव केला.

नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले, तरी नगरपरिषदेत नगरसेवक संख्येच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आघाडीवर आहे. एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी १७ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

तळेगाव दाभाडे शहरातील १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक निवडून द्यायचे होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे १० आणि भाजपचे ९ असे एकूण १९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित नगराध्यक्षपदासह ९ जागांसाठी मतदान झाले.
नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत रविवारी मतमोजणी पार पडली.

नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजप–राष्ट्रवादी महायुतीचे भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांना २० हजार ४५६ मते मिळाली. त्यांच्याविरोधात उभे असलेले अपक्ष किशोर भेगडे यांना ८ हजार ७०१, तर अपक्ष अॅड. रंजना भोसले यांना केवळ १ हजार ९६० मते मिळाली. या निवडणुकीत नोटाला ७२९ मते पडली.

दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणुकीत सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके यांनी २ हजार ५०१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना २ हजार ७७४ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढलेले भाजपचे माजी नगरसेवक अमोल शेटे यांना केवळ २७३ मते मिळाली.

या निकालामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीची सत्ता मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात शहराच्या राजकारणात या युतीची दिशा निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!