शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ८ मधून तुषार भिवाजी सहाणे निवडणुकीला सामोरे जात असून त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद, बैठका तसेच विविध जनसंपर्क कार्यक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या प्रचाराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
आज इंद्रायणी नगर, प्रभाग क्र. ०८, सेक्टर नं. ०३ येथील यश गार्डन, सिद्धिविनायक कॉलनी व समर्थ नगरी परिसरात त्यांनी प्रचार दौरा केला. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अपेक्षा आणि सूचना मांडल्या. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठी उपक्रम, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांबाबत त्यांनी ठोस भूमिका मांडल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली.

तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाकडून त्यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक होत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिक-केंद्रित निर्णय” हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असून, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. नागरिक संवादातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे विकास आराखडा तयार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
परिवर्तनाच्या या टप्प्यावर प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुषार सहाणे यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. वाढता जनसमर्थन आणि उत्साही वातावरण पाहता, आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाबाबत प्रभागात सकारात्मक चर्चा आणि अपेक्षा बळावत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.


