शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण १ (निवडणूक नियम) मधील नियम क्रमांक ८ अन्वये क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का-५, दिनांक १५/१२/२०२५ नुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ साठी मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
ही बैठक सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली असून, या बैठकीसाठी संबंधित प्रभागांतील सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, रहाटणी १७ असे आहे. या बैठकीत नामनिर्देशन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, निवडणूक नियम, आचारसंहिता तसेच इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली जाणार आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी या बैठकीस उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेबाबतची माहिती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


