शबनम न्यूज | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ (ड) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुषार भिवाजी सहाणे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गेल्या २० वर्षांपासून उद्योग, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेल्या तुषार सहाणे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या जाहीर पत्रकात सहाणे यांनी सांगितले की, जनसामान्यांच्या सुख-दुःखाशी कायम जोडले राहणे हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या काही वर्षांत कोणतेही पद नसतानाही त्यांनी अखंडपणे सामाजिक कार्य सुरू ठेवले असून, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
२०१७ च्या निवडणुकीत पराभव झाला असला, तरी त्या अनुभवातून खचून न जाता त्यांनी सेवा कार्य अधिक जोमाने सुरू ठेवले. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी या देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी नियुक्ती केली. त्यांच्या कार्यकाळात देवस्थानच्या विकासासाठी सुमारे ३७० कोटी रुपयांचा ऐतिहासिक विकास आराखडा मंजूर झाला असून, देवस्थानाची १२२ एकर जमीन पुन्हा प्राप्त करण्यात यश आले आहे.
“सेवा करण्यासाठी धनाची नाही, तर विकासासाठी लागणाऱ्या ताकदीची गरज असते,” असे नमूद करत सहाणे यांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस आराखडा मांडला आहे. मागील २० वर्षांच्या निस्वार्थ सेवेला संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
“बोलण्याचा काळ संपला, आता काम करण्याची वेळ आली आहे,” या घोषवाक्यासह तुषार सहाणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.


