spot_img
spot_img
spot_img

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा वतीने अभिवादन

शबनम न्यूज | पिंपरी

भारतीय घटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचारमूल्य आणि संविधानामुळे देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव असून त्यांनी दिलेली विचारधारा ही आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी आहे. असे सांगून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले व्यापक विचार आणि समता व बंधुभावाची शिकवण सर्वांनी जोपासावी, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी तसेच एच. ए क़ॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, सचिन पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ, शशिकांत मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड तर भीमसृष्टी पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास अधिकाऱ्यांसमवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई सदस्य (सचिव दर्जा) अँड. गोरक्ष लोखंडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गौतम चाबुस्कवार, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच शहरातील माजी नगरसदस्य, नगरसदस्या, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक, विधीतज्ञ, अर्थतज्ञ तसेच उत्तम लेखक आणि पत्रकार देखील होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले. सामाजिक विषमता, अनिष्ठ रुढी, परंपरा यांच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरातील राजकीय अभ्यासक तसेच थोर इतिहासकार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाचा अभ्यास करतात. त्यांनी घटनेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांसारखी मूलभूत तत्त्वे समाविष्ट करून भारताची ओळख जगातील एक सक्षम, आधुनिक, लोकशाहीप्रवण देश म्हणून निर्माण झाली आहे. तर ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा त्यांनी दिलेला संदेश आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरला आहे.

दरम्यान, सकाळी भीमसृष्टी पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!