शबनम न्यूज:प्रतिनिधी
मतदार यादीतील नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचा प्रकार समोर आला असताना, प्रभाग क्रमांक ५ मधील मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली गेल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात माजी नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला.

त्यांच्या सतर्कतेमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील गवळीनगर परिसरातील तब्बल ५,५०४ मतदारांची नावे पुन्हा मूळ मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. चुकीने दुसऱ्या प्रभागात गेलेली ही नावे परत आल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
हक्काचे मतदार परतल्याने माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. “कोणत्याही मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्हाला आमच्या मतदानाच्या हक्कातून चांगल्या उमेदवाराची निवड करण्याची संधी मिळाली आहे. हा मतरूपी आशीर्वाद योग्य उमेदवाराला देऊ,” अशी भावना मतदारांनी व्यक्त केली.
यामुळे मतदार यादीतील त्रुटींवर वेळीच लक्ष देणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


