शबनम न्यूज : प्रतिनिधी
उरुळी कांचन: उरुळी कांचन पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या मौजे नायगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने दिनांक ११ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नायगाव मार्ग वस्ती येथे राहत्या घरात अँगलला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजी बिभीषण कांबळे (वय ४०, रा. मार्ग वस्ती, नायगाव, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत शिवाजी कांबळे हे माळी काम करतात. शिवाजी कांबळे यांची बहीण सखूबाई या शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून घरी आल्या. तेव्हा त्यांना त्यांचा भाऊ मयत शिवाजी कांबळे हे घरात अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी ही माहिती त्यांचे वडील बिभीषण आप्पा कांबळे यांना दिली. मयत शिवाजी कांबळे यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बिभीषण कांबळे यांनी ही माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली.