पिंपरी : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील दोन मित्र पिंपरी-चिंचवड येथे आले आणि त्यांनी एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मोशी येथील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती येथे शनिवारी (दि.१२) सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
तुषार अशोक ढगे (वय २५), सिकंदर सल्लाउद्दीन शेख (३०, दोघेही रा. हुंडा पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार ढगे आणि सिकंदर शेख, हे दोघे मित्र आहेत. तुषारचे काका दत्तात्रय रावसाहेब ढगे शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे राहतात. तुषार आणि सिकंदर शुक्रवारी गावावरून पुण्याला आले होते. मात्र शनिवारी सकाळी दोघांनी मोशी येथील खिरीड वस्तीवरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषारचे काका दत्तात्रय ढगे यांना कळविण्यात आले. त्यानंतर नातेवाईक रात्री उशिरा पोहोचले. सिकंदर विवाहित, तर तुषार अविवाहित होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.