spot_img
spot_img
spot_img

२७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचा समारोप

बंधुत्वाची भावना समाजातील चांगुलपणा वृद्धिंगत करते कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन;

मान्यवरांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ व ‘विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान

शबनम न्यूज : प्रतिनिधी

पुणे: “समाजात चांगल्या माणसांची संख्या कमी होत चालली आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने समाजमन दूषित होतेय, याचा आपण अनेकदा खेद व्यक्त करतो. पण अशा आव्हानात्मक व निराशेच्या परिस्थितीत बंधुत्वाची भावना समाजात चांगुलपणा वृद्धिंगत करते. माणूस जोडण्याचे काम बंधुता चळवळीतून होत आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले.
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी कृष्णकुमार गोयल बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या संमेलनात विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, वरिष्ठ पत्रकार सचिन कापसे आदी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सौ. सविता मेनकुदळे यांनी पुरस्कार स्वीकारला. अनिल गव्हाणे (बीड), गोरख पालवे (नाशिक), पुष्पा दलाल (अमरावती), अनुराधा वायकोस (परभणी), संध्या भोळे (भुसावळ), कांचन गवळी (टिटवाळा), दीपाली भोसले (पुणे), सागर काकडे (सातारा), अमीर पटेल (सांगोला), स्वाती ठुबे (अहिल्यानगर), गौसपाक मुलानी (सांगोला) व विठ्ठल संधान (नाशिक) यांना ‘विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तत्पूर्वी, ‘सुवर्णमहोत्सवी विश्वबंधुता चळवळीची प्रशंसनीय यशोगाथा’ या विषयावर शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे व्याख्यान झाले. तसेच दुपारच्या सत्रात कवयित्री सीमा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जल्लोष अभिजात मराठीचा’ हे काव्यसंमेलन झाले. त्यामध्ये डॉ. अशोककुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, विनोद सावंत, प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्यासह निमंत्रित कवींनी सहभाग घेत काव्यरचना सादर केल्या. चंदन तरवडे (कोपरगाव) यांना बंधुतापर्व साहित्य पुरस्कार, शिल्पा कुलकर्णी (पुणे) यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, तर सीमा झुंजारराव (मुंबई) यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. सुभाष वारे म्हणाले, “मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात मन आणि शरीराच्या अफाट क्षमता नीटपणे वापरल्या गेल्या नाहीत. सहकार्य आणि सकारात्मकतेचा भावनेतून त्याचा समाजहित, देशहितासाठी चांगला उपयोग व्हायला हवा. त्यासाठी जात, धर्म, वर्ण, आर्थिक भेद, द्वेषभावना बाजूला ठेवून बंधुतेच्या विचारांची गुंफण करायला हवी. महापुरुषांनी दिलेल्या विचारांची बेरीज आणि संविधानाची सांगड घालून येणाऱ्या आव्हानांचा सामना एकोप्याने करण्याची गरज आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा विचार घेऊन चालणारे सर्वजण तथागत भगवान बुद्धांचा वारसा पुढे नेत आहेत. संतांनी दिलेली शिकवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि मानवतेचा, बंधुतेचा विचार देशाला एकसंध ठेवण्यासाठी पूरक आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, यासाठी युवापिढीने यात सहभागी व्हावे. समाजातील द्वेष, मत्सर दूर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सविता मेनकुदळे, डॉ. तेजश्री पारंगे यांनीही सत्काराला उत्तर देत बंधुतेची ही पताका घेऊन पुढील काळात काम करत राहू, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. अरुण आंधळे यांनी आभार मानले. मंदाकिनी रोकडे, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. भारती जाधव, प्रा. डॉ. सविता पाटील, प्रा. सायली गोसावी यांनी संमेलनाचे संयोजन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!