शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचना तात्काळ निकाली काढा, असे निर्देश आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी दिले आहेत.
महापालिकेतील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात आज प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना यासह मतदान केंद्र निश्चिती, दुबार मतदार यादी आदी कामकाजाबाबत आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, नगर सचिव मुकेश कोळप, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सिताराम बहुरे, संदीप खोत, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, तानाजी नरळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, राजाराम सरगर, प्रशासन अधिकारी सरिता मारणे, संगीता बांगर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यालय अधीक्षक रमेश यादव तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, नागरिकांचे नाव मतदार यादीत योग्यरित्या समाविष्ट व्हावे, दुबार नोंदणी टाळली जावी आणि अधिकाधिक पात्र मतदारांचा सहभाग सुनिश्चित व्हावा, यासाठी निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी वर्गाने सूक्ष्म नियोजन करून प्रारूप मतदार यादीवर आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांची छाननी करावी. हरकती व सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या निकाली काढाव्यात. नियोजित महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची निश्चिती, नव्या तात्पुरत्या मतदान केंद्रांची आवश्यकता, सुलभ सुविधांची उपलब्धता, तसेच क्षेत्रनिहाय मतदार संख्येचे विश्लेषण याबाबतही अधिकाऱ्यांनी सजग राहून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीची तयारी म्हणून शहरातील मतदान केंद्रांची स्थळ निश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुका, मतदान केंद्रांची सुविधा, दिव्यांगांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे आणि प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादी, मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश देखील आयुक्त हर्डीकर यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना तांत्रिक अचूकतेसह निकाली काढण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून कार्यवाही गतीमान केली आहे. नागरिकांनी केलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकारी प्राधान्याने कार्यवाही करत आहेत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका








