spot_img
spot_img
spot_img

रसिकांनी अनुभवले लतादीदी, कवी ग्रेस यांचे दुर्मिळ स्मरणरंजन!

शबनम न्यूज | प्रतिनिधी
विश्वविख्यात गायिका असणाऱ्या आपल्या ज्येष्ठ भगिनीकडून, आणि सर्वांत आवडत्या कवीकडून स्वतःविषयीचे भावनोत्कट कौतुकोद्गार ऐकताना स्वतः भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पाहण्याचा योग रसिकांनी अनुभवला. आपल्या बंधुंविषयी बोलताना लतादीदींकडून त्यांच्या निर्मळ आवाजातील काही रचना, गाणी, गजल, श्लोक, ज्ञानदेवांच्या रचना, चित्रपटगीते यांचे गुणगुणणेही एक वेगळा अनुभव देणारे ठरले.

पं. हृदययनाथ मंगेशकर यांच्या नुकत्याच झालेल्या ८९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर ‘दीनायन कलापर्व’तर्फे या ध्वनिचित्रफिती रसिकांसमोर आणल्या आणि पं. हृदयनाथ यांच्या बालपणापासूनच्या आठवणींपासूनचा हृद्य प्रवास खुद्द लतादीदींकडून समोर आला. गायिका मनीषा निश्चल्स महक यांच्यातर्फे कार्यक्रमाचे संयोजन केले होते. याप्रसंगी भारती हृदयनाथ मंगेशकर, पं. सत्यशील देशपांडे, निवेदक सुधीर गाडगीळ, अरुण नूलकर, अरुण काकतकर तसेच मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर उपस्थित होते. चित्रफीत निर्माते काकतकर यांनी हृदयनाथांना मिठी मारताच दोघेही गलबलून गेले. या दोन महाविभूतींना कॅमेरात कैद करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे भावोद्गार काकतकर यांनी काढले. या दुर्मिळ कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉ. धनंजय केळकर यांनी अरुण काकतकर आणि मनीषा निश्चल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


बाळने वेगळी शैली घडवली: लतादीदी
हृदयनाथ अर्थात बाळच्या बालपणाविषयी आणि त्यांच्या अपघाताविषयीची माहिती सांगून लतादीदी म्हणाल्या, आमच्या बाबांनी, दीनानाथांनी त्यांच्या काळात प्रचलीत आणि लोकप्रिय असणारी गायनशैली न अंगिकारता, स्वतःची निराळी गायनशैली शोधली, प्रतिभेने वाढवली आणि मग सादर केली, ती लोकप्रिय केली. याबाबतीत बाळने बाबांचाच आदर्श घेऊन काम केले. स्वतःची पूर्णपणे वेगळी, सुंदर, पण गायला कठीण अशी शैली विकसित केली आणि ती आता लोकप्रिय झाल्याचे आपण पाहात आहोत. बाळचे वाचन अफाट आहे. प्रतिभेचे देणे तर आहेच, आवाजही उत्तम आहे. साधनेने त्याने गायन सजवले आहे. तो एकपाठी आहे, त्याचे पाठांतर आश्चर्यकारक आहे. आम्ही मिळून केलेले ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, मीरा, गालिब, शिवकल्याण राजा, सावरकरांची गीते, कोळीगीते सर्वच संगीतप्रकल्प यशस्वी झाले. संगीतकार म्हणून त्याने आता बहिणींपेक्षा निराळे, आणि नवे आवाज शोधावेत, वापरावेत, असे मला वाटते, असा सल्लाही लतादीदींनी या ध्वनिचित्रफितीमध्ये बोलून दाखवला आहे.

एकमेवाद्वितीय स्वरपुरुष: कवी ग्रेस
सुरवातीचे ध्वनिचित्रमुद्रित मनोगत कवी ग्रेस यांचे होते. पं. हृदयनाथ यांच्याविषयी भरभरून बोलताना ग्रेस यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडणी केली. ज्यांना काव्यातले संगीत कळते आणि संगीतातले काव्य आकळते, असे एकमेवाद्वितीय स्वरपुरुष म्हणजे हृदयनाथ आहेत, असे ग्रेस म्हणाले. कवितेतील स्वरानुभूती वाचण्याचा प्रयत्न हृदयनाथ करतात, काव्यानुभूतीतून स्रवणाऱ्या संगीताची आत्ममग्न छाया त्यांच्या सांगीतिक प्रतिभेवर पडल्याचे जाणवते. हेवा करावा, अशी प्रतिभा त्यांना लाभली आहे. माझ्या कवितांच्या माध्यमातून हा स्वरपुरुष मला लाभला, असे ग्रेस म्हणाले.  

डाॅ. धनंजय केळकर म्हणाले, मंगेशकर रुग्णालयाची प्रेरणा लतादीदींची असली तरी प्रत्यक्षातले व्यावहारिक कार्य हृदयनाथ यांनीच पेलले आणि माईंचे स्वप्न पूर्ण केले. पुस्तकातले कवी त्यांनी हृदयस्थ केले. त्यांची विलक्षण प्रतिभा संगीतापुरती नसून, ती आध्यात्मिक पातळीवरील आहे. त्यामुळे त्यांच्या रचना संगीतापलीकडे रसिकाला घेऊन जातात. त्यांच्या भिनलेले भारतीयत्व प्रेरणादायी आहे. त्यांची चिकित्सक पण अभ्यासू वृत्ती अनुकरणीय आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!