spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांचा समावेश होता.

या मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा ते ग्रॅज्युएट अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुलाखतीच्या माध्यमातून कंपन्यांनी विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही दिले. महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदींनी मेळाव्याला भेट दिली. दरम्यान, डेटा विश्लेषण करून त्या आधारे नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून सीएचडीसी प्रकल्प कार्यरत असून त्या अंतर्गत या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाचे एक उद्दिष्ट म्हणजे शहरातील सुशिक्षित
तरुण–तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबवणे. आजच्या रोजगार
मेळाव्यात तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि कंपन्यांकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद अत्यंत समाधान देणारा आहे.
पुढील काळातही अशा संधी अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या आमच्या योजना आहेत.

– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आमचे ध्येय समाजातील तरुणांना कौशल्य, मार्गदर्शन आणि योग्य संधी उपलब्ध करून देणे हे आहे. या रोजगार
मेळाव्यात विविध कंपन्या आणि तरुण एकाच व्यासपीठावर येऊन परस्पर संवाद साधू शकले, ही अत्यंत सकारात्मक
बाब आहे. भविष्यातही आम्ही समाजहितार्थ अशा उपक्रमांना सतत पाठबळ देत राहण्याचा निर्धार व्यक्त करतो.

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!