शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिका, समाज विकास विभाग, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर येथे मोफत भव्य रोजगार मेळावा दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शहरातील विविध औद्योगिक कंपन्या सहभागी होणार असून युवक–युवतींना एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत जास्त युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात रिटेल, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, मीडिया अँड एंटरटेनमेंट, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ITES), हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल्स आदी क्षेत्रांतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी ही उत्कृष्ट संधी असून उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यात उपस्थित राहावे. हा मेळावा शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ऑटो क्लस्टर, चिखली येथे पार पडणार आहे. मेळाव्यात सहभागी होताना उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, गुणपत्रिका आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवावेत, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागातून देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, उद्योगसंवाद आणि संधी उपलब्ध करून देण्यावर सतत भर देत आहे. सार्वजनिक–खासगी भागीदारीतून राबविले जाणारे रोजगार मेळावे हे शहरातील तरुणांसाठी रोजगाराकडे जाणारा विश्वासार्ह आणि सुलभ मार्ग ठरतात. स्थानिक उद्योगांच्या गरजा आणि तरुणांच्या कौशल्यांचा मेळ घालून सर्वांगीण औद्योगिक प्रगती साधणे हे महापालिकेचे ध्येय आहे.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळाली असून येथे कौशल्याधारित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रशासन, औद्योगिक क्षेत्र आणि युवक यांच्यातील प्रभावी समन्वय वाढला, तर रोजगारनिर्मितीची गती आणखी वाढेल. महापालिकेचा उद्देश तरुणांना केवळ नोकरी मिळवून देणे नसून त्यांना सक्षम, कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम बनवणे हा आहे. हा रोजगार मेळावा त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका








