शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव वेगात आलेल्या वाहनाने धडक दिल्यामुळे लाकूड घेऊन जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना उत्कर्ष चौकाजवळ १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
व्यंकटेश मानसिंग पवार (वय ३५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने मंगळवारी (दि. २५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती व्यंकटेश पवार हे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान लाकूड घेऊन जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. त्यात व्यंकटेश पवार हे गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.








