शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीवर अनेक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी आणि नागरिकांना यावर त्रुटी नोंदविता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
३ डिसेंबरपर्यंत नागरिकांना हरकती, तक्रारी नोंदविता येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळपर्यंत मतदारयादीवर ३ हजार ३४३ हरकती, त्रुटी नोंदविण्यात आल्या.
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ४१ प्रभागांमध्ये होणार आहे. या प्रभागांची प्रारूप मतदारयादी महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या मतदारयादीवर हरकती आणि तक्रारी नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले असून, दररोज येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढत आहे.








