एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे पुण्यात भव्य स्वागत
शबनम न्यूज | प्रतिनिधी
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर या वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कृष्ण प्रकाश (आयपीएस), अतिरिक्त पोलीस महासंचालक – फोर्स वन आणि अध्यक्ष हॉकी महाराष्ट्र) यांनी निभावले. यावेळी हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे आणि हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांनीही ट्रॉफीचे स्वागत केले. याशिवाय विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस (प्राचार्य – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, पुणे), सिस्टर लैला (प्राचार्या – सेंट एन्स हायस्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले,
“पिल्ले परिवाराने जागतिक पातळीवर अनेक विक्रम नोंदवले आहेत. हॉकी क्षेत्रात पुण्याचे योगदान अतिशय मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातून आणखी धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांच्यासारखे खेळाडू निर्माण होतील, अशी माझी अपेक्षा आहे. आज पुण्यातील दहा खेळाडू राष्ट्रीय निवड शिबिरात सहभागी आहेत, ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यातील खेळाडूंना आवश्यक ती मदत राज्य शासन आणि महाराष्ट्र संघटना नक्कीच देईल.”
“ हॉकी हा फक्त खेळ नाही, तर ध्यान व अनुशासनाचा संगम आहे” – कृष्ण प्रकाश
कार्यक्रमात बोलताना आयपीएस कृष्ण प्रकाश म्हणाले, “हॉकी ट्रॉफी टूरचा मुख्य उद्देश राष्ट्रीय खेळाचा प्रसार करणे आणि मेजर ध्यानचंद यांसारख्या महान खेळाडूंना आदरांजली वाहणे हा आहे. निरोगी शरीरातूनच निरोगी मनाची निर्मिती होते. म्हणून हॉकी हा केवळ खेळ नसून ध्यान, शिस्त आणि व्यायाम यांचा सुंदर संगम आहे.”
ते पुढे म्हणाले,“नेल्सन मंडेला यांनी खेळाच्या माध्यमातून पंथ, भाषा आणि वर्णभेद दूर करून राष्ट्राला एकत्र आणले. भारताची युवा शक्ती अपार आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी पदके जिंकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या कार्यक्रमात विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस आणि सिस्टर लैला यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पुण्यात ट्रॉफी टूरचा उत्साहात प्रवास – ट्रॉफी हैदराबादकडे रवाना
ट्रॉफी टूरची सुरुवात लोहेगाव येथील संत तुकाराम हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. येथे तीन शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यानंतर ट्रॉफीचा काफिला खडकीतील एक्सेलसियर थिएटर चौकात दाखल झाला. येथून रॅली निघाली आणि राजघरना, सलाम जनरल स्टोअर, गांधी चौक मार्ग ओलांडत ती कर्नल भगत हायस्कूल येथे पोहोचली. रॅलीत स्थानिक युवक, प्रशिक्षक व ज्येष्ठ हॉकीपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यानंतर ट्रॉफीला सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर आणण्यात आले, जिथे भव्य स्वागत सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर ही ट्रॉफी पुढील प्रवासासाठी पुण्यातून हैदराबादकडे रवाना झाली.








