शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिलांच्या रोजगाराबाबत शासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत दुर्गा ब्रिगेड संघटनेने आक्रमक पाऊल उचलले असून शहरातील हजारो महिलांच्या हाताला काम नसल्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेहरूनगर महानगरपालिका क-प्रभाग कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत महिलांच्या रोजगार, लघुउद्योग, स्वच्छता व मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. क-क्षेत्रीय प्रशासन अधिकारी सुनीता वाइकर , तसेच समाज विकास विभागातील मा. जावजी पोटे व मा. सुप्रिया करंजकर यांना निवेदन देण्यात आले.
बैठकीत सांगण्यात आले की महानगरपालिका महिला विकास विभाग शहरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अयशस्वी ठरत आहे. विविध योजना, सूचना संस्था पातळीपर्यंत जातात; मात्र त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत, ही गंभीर बाब दुर्गा ब्रिगेडने प्रशासनासमोर मांडली. रोजगार, मार्गदर्शन, प्रशिक्षण व लघुउद्योगांसाठी जागा–भांडवल–विक्रीव्यवस्था देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची तातडीची मागणी करण्यात आली.
बालाजी नगर परिसरातील स्वच्छतेच्या समस्यांबाबतही आरोग्य विभागाला त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले.
पुढील काळात महिलांना प्रत्यक्ष रोजगार मिळावा यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन संयुक्तरित्या योजना राबवणार आहेत. उद्योगांची कामे देण्यासाठी आम्ही तयार आहोत महानगरपालिकेने प्रशासनिक सहकार्य करावे असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
महानगरपालिकेने चार दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा कु. दुर्गा भोर यांनी दिला. बैठकीस संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर, अभय भोर, राहिसा पठाण, रेश्मा मुल्ला, सविता शेंडगे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.








