शबनम न्यूज | प्रतिनिधी
सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. दरम्यान, तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक असे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. या उमेदवारांचे एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपची युती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस 17 आणि भाजप 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. तळेगाव दाभाडे मध्ये हे दोन्ही पक्षच मुख्य पक्ष आहेत, त्यामुळे चार प्रभागात प्रतिस्पर्धी उमेदवारांची अर्ज आले नाहीत. त्यामुळे या चार प्रभागातून चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निश्चित आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या हेमलता खळदे ,प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे दीपक भेगडे ,शोभा परदेशी आणि प्रभाग क्रमांक १ मधील निखिल भगत यांची बिनविरोध निवड निश्चित असून औपचारिकता बाकी आहे.


