spot_img
spot_img
spot_img

एका रात्रीत आरक्षणात बदल; नेमकं परिणाम काय?

विशेष लेख | गजाला सय्यद

पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण आहे. महापालिका निवडणूक कधी पार पडतील? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये आपल्या गटातून इतर आरक्षण पडल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अडचणीत आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण 128 जागांपैकी 92 जागांवर आरक्षण पडले, त्यात एकूण 78 माजी नगरसेवकांच्या जागा सुरक्षित राहिल्या आहेत तर 47 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरक्षण जाहीर होताच एका रात्रीत प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 30 मधील आरक्षणामध्ये बदल करण्यात आले. यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर थेट परिणाम झालाय..!

प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 19 यामधील इच्छुकांमध्ये देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एका रात्री असं काय घडलं? ज्यामुळे आरक्षणात बदल करण्यात आले, असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरात उपस्थित होत आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत पार पडली, या सोडती नंतर अनेक इच्छुकांवर परिणाम झाला. खरे तर नियमानुसार ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) किंवा दोन्ही करीता राखीव असतील, परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरिता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी तरतूद आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 30 मध्ये ही नियमातील तरदूत वापरली गेली नव्हती, हीच चूक आयोगाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे ओबीसी महिला आरक्षणाचा फेरबदल करण्यात आला. मात्र निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणालाही कोणतीही हरकत असल्यास ती नागरिकांना 17 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक विभागाकडे नोंदविता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दोन प्रभागातील चार जागांवर झालेला बदल अनेक इच्छुकांसाठी परिणामकारक ठरला. परंतु ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आला असल्याचा दावा निवडणूक विभागाने केला.

नेमका बदल काय झालाय? ते आपण पाहूयात…

१. निवडणूक आयोगाने केलेल्या दुरुस्तीनंतर प्रामुख्याने प्रभाग क्र. 19 आणि प्रभाग क्र. 30 मधील आरक्षणात फेरबदल झाले आहेत.

२. प्रभाग क्र. 30 : येथे ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली ‘क’ जागा आता ओबीसी महिलांसाठी राखीव झाली आहे.

३. प्रभाग क्र. 30 : या प्रभागातील ‘ड’ जागा जी पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती, ती आता फक्त सर्वसाधारण झाली आहे.

४. प्रभाग क्र. 19 : ओबीसी जागेवर महिला आरक्षण झाले असल्याने, पूर्वी सोडतीत ‘ब’ जागा जी ओबीसी महिलांसाठी राखीव झाली होती, त्यावरील महिला आरक्षण रद्द झाले आहे आणि ती आता फक्त ओबीसी प्रवर्गासाठी असेल.

५. प्रभाग क्र. 19: प्रभाग 30 मधील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रभाग क्र. 19 मधील ‘क’ जागा आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

यामुळे आता प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना 17 नोव्हेंबर पासून स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर 24 नोव्हेंबर पर्यंत हरकती स्वीकारला जाणार आहेत, अशी माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!