शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी – पिंपरी-चिंचवड तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. शहराच्या जीवनवाहिनी ठरणाऱ्या आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील प्रचंड दिरंगाई आणि वाढीव खर्चाबद्दल आम आदमी पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
वारंवार मुदतवाढ देऊनही योजना अपूर्णच राहिली असून, अनेक प्रभागातील नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वांत धक्कादायक बाब अशी की, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेला अर्धवट काम असतानाही सलग चौथी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ₹९ कोटी ३१ लाख रुपये वाढीव खर्च म्हणून देण्यात आले आहेत.
आम आदमी पार्टीच्या मते, हा वाढीव खर्च म्हणजे नागरिकांच्या कराच्या पैशांचा सरळसरळ अपव्यय आणि मनपा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे.
आम आदमी पार्टीच्या तीन प्रमुख मागण्या-
- उच्च-स्तरीय चौकशी समितीची तात्काळ नियुक्ती
- वाढीव खर्च व निर्णयप्रक्रियेची सखोल तपासणी
- योजना पूर्ण करण्यासाठी ठोस, बंधनकारक आणि अंतिम कालमर्यादा जाहीर करणे.
- दिरंगाईस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि प्रकल्प सल्लागार संस्थेवर तात्काळ कडक शिस्तभंगात्मक कारवाई करणे.
या प्रसंगी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले,“जी योजना शहराला सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा देण्यासाठी होती, तीच योजना मनपाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण करत आहे. दिरंगाई, वाढीव खर्च आणि गैरव्यवहाराची साखळी थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे.”
आम आदमी पार्टी – पिंपरी-चिंचवडने स्पष्ट इशारा दिला आहे की, मनपा प्रशासनाने तातडीने जबाबदारांवर निर्णायक कार्यवाही केली नाही, तर नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.








