spot_img
spot_img
spot_img

हिंदू समाजाच्या हृदयात सेवाभाव! – स्वपनकुमार मुखर्जी

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘हिंदू समाजाच्या हृदयात सेवाभाव असतो; कारण जन्मापासून कुटुंबात विविध सेवांचे संस्कार नकळत मुलांवर घडवले जातात!’ असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा केंद्रीय सहसेवा प्रमुख स्वपनकुमार मुखर्जी यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, शनिवार पेठ, पुणे येथे रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सेवाकुंभ २०२५ या सोहळ्यातील समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून
स्वपनकुमार मुखर्जी बोलत होते. ज्येष्ठ सिनेअभिनेते प्रवीण तरडे, विश्व हिंदू परिषद प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष कृष्णकुमार चांडक, सेवाप्रमुख ॲड. श्याम घरोटे, बांधकाम व्यावसायिक मदन ठोंबरे, नितीन जाधव, निषिद शहा आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
स्वपनकुमार मुखर्जी पुढे म्हणाले की, ‘जगातील सुमारे ऐंशी देशात विश्व हिंदू परिषद ही सेवाभावी संघटना कार्यरत आहे. हिंदू समाज आणि संस्कृती सर्व जगात उन्नत व्हावी, सर्व जगाला ज्ञान देण्याचे काम हिंदूंनी करावे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळाव्यात साठ कोटींहून अधिक भाविक एकत्र आले होते; आणि यापैकी एकही जण उपाशी राहिला नाही, हे हिंदू समाजाच्या सेवाभावाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्याच दुर्लक्षामुळे धर्मांतरित झालेल्या दुर्गम भागातील हिंदू बांधवांना आपल्यात सामावून घेत त्या तळागाळातील हिंदू समाजापर्यंत हा सेवाभाव पोहचला पाहिजे. यासाठी तन, मन, धन अर्पण करून आपण विश्व हिंदू परिषदेच्या या सेवाकार्यात सामील व्हावे!’ प्रवीण तरडे यांनी आपल्या मनोगतातून, ”वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व हिंदुधर्म मानत असल्याने या धर्मात आपला जन्म झाला, हे आपले परमभाग्य आहे. त्यामुळेच हिंदुधर्माचे आचार, विचार, संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी जातीपातीच्या भिंती पाडून एकत्र आले पाहिजे. प्रत्येक हिंदूची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. ‘जिथे धर्म तिथे जय!’ हा विचार कायम लक्षात ठेवून आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या क्षेत्रात हिंदुधर्मासाठी कार्यरत व्हा!’ असे आवाहन केले. 
श्रीराम, जानकी, लक्ष्मण आणि हनुमान यांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दर पाच वर्षांतून वेगवेगळ्या प्रांतात सेवाकुंभाचे आयोजन केले जाते, अशी माहिती दिली. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले; तसेच साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यामध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर  आणि अहिल्यानगर या विभागांतून सेवाकुंभात सहभागी झालेल्या प्रकल्पातील आणि वसतिगृहातील जनजातीय मुलामुलींनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन (स्टॅाल) कार्यक्रमस्थळी भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पाटील आणि डॉ. शर्वरी यरगट्टीकर यांनी केले. संयोजन दिलीप देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, दिनेश लाड, विजय देशपांडे, कीर्तिश जोशी, ज्ञानेश्वर इंगळे, संजय गोडबोले यांनी केले. कार्यक्रमानंतर सहभागी  जनजातीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलांच्या सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!