शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून नेण्याचा प्रयत्न करणारी महिला पकडली गेली.झटापटीत चोरट्याने महिलेने कटरने प्रवासी महिलेच्या हातावर वार करून पसार होण्याचा प्रयत्न केला. प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी महिला पकडली गेली.
या प्रकरणी अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास महापालिका ते वसंत चित्रपटगृह दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत आरोपी भोसले हिने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. तिने आरडाओरडा केला.
भोसलेने धावत्या बसमधून उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झटापटीत तिने तक्रारदार महिलेच्या हातावर कटरने वार केला. महिलेच्या हाताला दुखापत झाली. अशा परिस्थितीत तक्ररदार महिलेसह अन्य प्रवाशांनी भाेसलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भोसलेला अटक करण्यात आली आहे.








