spot_img
spot_img
spot_img

स्वातंत्र्याचा पहिला लढा बिरसा मुंडा यांनी दिला! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी आपल्या देशातील पहिला लढा भगवान बिरसा मुंडा यांनी दिला!’ असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी शाहीर योगेश रंगमंच, अनुदानित आश्रमशाळा अर्थात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित  आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गौरव दिवस आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्यात पद्मश्री गिरीश प्रभुणे बोलत होते. याप्रसंगी मोशी येथील प्रभारी मंडल अधिकारी बाळकृष्ण साळुंखे, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सुरेश गुरव, माजी अध्यक्ष शांताराम इंदोरे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्  प्रधानाचार्य पूनम गुजर, संदिप साबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, ‘आपल्या देशातील संस्कृतीवर आधी इस्लाम आणि नंतर ख्रिश्चन यांनी आक्रमणे केलीत. या आक्रमणांच्या विरोधात छत्रपती शिवाजीमहाराज, पेशवे, मराठे यांनी लढा दिला. या लढाईत जनजातीमधील असंख्य वीरांनी आपले योगदान दिले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईची संभावना ‘बंड’ अशा शब्दाने करीत ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक या लढ्याची हेटाळणी केली. वास्तविक देशात जनजाती समाजातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना  वेगवेगळ्या प्रांतात अनेकदा लढाईत पराभूत केले; परंतु धूर्त ब्रिटिशांनी हा इतिहास कधीही जगासमोर येऊ दिला नाही. उलट समाजात दुफळी माजावी म्हणून ब्रिटिशांनी जनजातींचा ‘आदिवासी’ असा उल्लेख केला; परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना ‘जनजाती’ असे संबोधले आहे!’ यावेळी प्रभुणे यांनी बिरसा मुंडा यांचा सविस्तर इतिहास कथन केला. बाळकृष्ण साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून, ‘गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना पाहून आज मला माझे बालपण आठवले; कारण माझे स्वत:चे  शिक्षण जनजाती आश्रमशाळेत झाले आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. सुरेश गुरव यांनी जनजाती आश्रमशाळेतील कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार काढले; तर शांताराम इंदोरे यांनी, ‘फक्त पंचवीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बिरसा मुंडा यांच्या देदीप्यमान कार्यामुळे जनजातीय समाजाने त्यांना ‘भगवान’ अशी उपाधी बहाल केली!’ अशी माहिती दिली.
कार्यक्रमापूर्वी, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् ते क्रांतितीर्थ चापेकर वाडा आणि परत गुरुकुलम् अशी अभिवादन फेरी काढण्यात आली. वाद्यांचा गजर करीत गुरुकुलम् मधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने फेरीत सहभागी झाले होते. दीपप्रज्वलन, अखंड भारतमाता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन, सरस्वतीस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पूनम गुजर यांनी प्रास्ताविक केले. गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेषभूषा परिधान करून त्यांच्या कार्याची माहिती दिली. अतुल आडे, हर्षदा धुमाळ, मारोती वाघमारे, शिक्षकवृंद, कर्मचारी, जनजातीय कार्यकर्ते यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सतिश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. ऋषभ मुथा यांनी आभार मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!