शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांपुढे खरोखरच प्रश्न निर्माण झाला होता. शरद पवार यांच्यावर बारामतीकरांचे प्रेम आहे, तसेच माझेही प्रेम आहेच ना, का प्रेम नसावे? पण मी राजकीय भूमिका वेगळी घेतली. शेवटी राजकारणात दिलदारपणा, मनाचा मोठेपणा महत्त्वाचा, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीत राष्ट्रवादी भवनात बारामती नगर परिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राजकारणात सकुंचित विचारांचे राहून चालत नाही. माणसं जोडायची असतात, काही गोष्टी घडतात. पण झालं गेलं गंगेला मिळालं, असे म्हणत पुढे जायचे असते. तुम्हाला विकास हवा की, गटातटाचे राजकारण? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्ही माझे ऐकले तर मी तुमचे ऐकले आणि विकासाची गती कायम ठेवेल,” असे प्रतिपादन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.








