-
मोरवाडी चौकातील बॅरिकेट्स हटवून वाहतूक पूर्ववत..
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरीतील मोरवाडी चौकात अर्बन स्ट्रीट प्रकल्पाच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत तर वाहतूक पूर्ण ठप्प होत होती. अनेकदा रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनेही अडकल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या सर्व स्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
ही समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक शैलेश मोरे सातत्याने सक्रिय राहिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी व मौखिक प्रतिनिधित्व केले; मात्र महानगरपालिकेकडून बॅरिकेट्स हटवण्यात अनाकलनीय विलंब होत होता. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे संपूर्ण परिस्थिती कळवली. तसेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली.
मोरे यांच्या या ठाम भूमिकेमुळे आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे बुधवारी रात्री उशिरा महापालिकेने बॅरिकेट्स हटवण्याचे पाऊल उचलले. यानंतर मोरवाडी चौक वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
स्थानिक रहिवाशांनी मोरे यांचे मनापासून कौतुक करत म्हटले की, “आमच्या त्रासाची दखल घेऊन त्यांनी केलेला पाठपुरावा खरोखर कौतुकास्पद आहे.”
या संपूर्ण प्रक्रियेत आमदार शंकर जगताप, विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे खासदार श्रीरंग बारणे यांचे विशेष सहकार्य लाभले. नगरसेवक शैलेश मोरे यांनी नागरिकांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील काळातही सार्वजनिक प्रश्नांसाठी अशाच प्रकारे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.








