शबनम न्यूज | प्रतिनिधी
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. या विक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन अमृत संस्थेला सन्मानित करण्यात आले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाबद्दल ‘अमृत’ संस्थेचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची दुर्गसंस्कृती ही आपल्या इतिहासाचे प्रतीक आहे. ‘अमृत दुर्गोत्सव’ या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाशी जोडण्याचे उल्लेखनीय कार्य अमृत संस्थेने केले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाद्वारे युनेस्को मान्यताप्राप्त १२ ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि इतर देशातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात आले.


