चिंचवडगाव : संकष्टी चतुर्थी निमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि सावली सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ३१वे रक्तदान शिबिर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या शिबिरात १११ भाविकांनी रक्तदान करून समाजसेवेचा सुंदर आदर्श घालून दिला. आतापर्यंत झालेल्या सर्व ३१ शिबिरांमध्ये मिळून २८४२ रक्तदाते रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत आहेत.
हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या गणेश संकष्टी चतुर्थीला नियमितपणे आयोजित केला जातो, आणि आता त्याला अधिक संघटित व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त होत आहे.
मुख्य विश्वस्त आदरणीय श्री. मंदार देव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा समाजोपयोगी उपक्रम आज एक सशक्त आणि प्रेरणादायी चळवळ बनला आहे.

शिबिरास श्री. मंदार देव महाराज, श्री. निरंजन देव साहेब, कारभारी जोशी सर, डॉ. मोसांगी, डॉ. गणेश अंबीके, सरिता अंबीके, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे संचालक श्री.भारत नरवडे, भारत बिरादर, कमलाकर आदसुल, प्रसन्न नाहर, कर्नल संजय तबीब, डॉ. पवार, युगांदर गौतम, भाऊसाहेब पाटील, डॉ. आरव पवार, डॉ. अंजली, निकिता कुलकर्णी आदी मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले व या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराचे आयोजक सेवेकरी — श्री.सुहास हिंगणे, सुजित भोसले, किशोर भगत, प्रदीप सायकर, दीपक नवरंगे, महेश संचेती, भारत नरवडे, चेतन तळेले, सागर कुटे, गुलाब नाईकवाडी, स्वानंद, तृषाली, स्मिता, मिलन, सुप्रिया गोडांबे, सरिता हिंगणे, प्राची भगत आणि प्रणिता भोसले — यांच्या अथक प्रयत्नांनी आणि उत्कृष्ट समन्वयाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरास अनेक प्रसिद्ध डॉक्टर, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन रक्तदाते व आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे रक्तदात्यांचा उत्साह अधिक वाढला.
या शिबिरात सुजित भोसले यांनी आपले ८७ वे, तर महेश संचेती यांनी आपले ३६ वे रक्तदान करून सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
विशेष म्हणजे, चिंचवड देवस्थान ट्रस्टमार्फत गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्यामुळे अनेकांना नवजीवन लाभत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विश्वस्त, सेवेकरी, रक्तदाते व आश्रयदाते यांचे विशेष योगदान लाभले. आयोजकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, दर महिन्याच्या चतुर्थीला होणाऱ्या रक्तदान शिबिरात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.








