शबनम न्यूज | प्रतिनिधी
बालप्रतिभांना प्रोत्साहन देणाऱ्या “केअर फॉर यू फाउंडेशन” या समाजसेवी संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय “हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार – सिझन 4” या भव्य उपक्रमाचा ग्रँड फिनाले रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी डी. वाय. पाटील ऑडिटोरियम, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
अल्पसंपन्न बालकांना शिक्षण, संस्कार आणि संधी देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली केअर फॉर यू फाउंडेशन ही संस्था 80G, FCRA व CSR मान्यता प्राप्त असून, या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील विविध बालसंवर्धन संस्था (Child Care Institutions) मधील मुलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील ४० हून अधिक बालसंवर्धन संस्थांमधील ९० निवडक स्पर्धक सहभागी होणार असून, चित्रकला, हस्तकला, सामान्य ज्ञान आणि गायन या चार प्रमुख गटांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. यासाठी मुलांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यपूर्ण प्रशिक्षण व प्री-फिनाले ऑडिशन दिले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्यासोबतच्या संवाद सत्राने होणार आहे. ते या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून मुलांना ‘अमर्याद स्वप्न पाहण्याची’ प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस दलातील डीजी व चीफ ऑफ फोर्स वन आयपीएस कृष्ण प्रकाश हे मुख्य संरक्षक (Chief Patron) आणि स्थापन सल्लागार म्हणून उपस्थित राहतील. तर, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. अदिती तटकरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राहणार आहेत. यावेळी आयुक्त नयना गुंडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, आदी मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमामागील प्रेरणास्थान म्हणजे संस्थेच्या संस्थापक व विश्वस्त सीए पायल सारडा राठी. त्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाने हजारो बालकांच्या जीवनात शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा प्रकाश फुलवला आहे. या वर्षीच्या फिनालेमध्येही एक अनोखी सामाजिक परंपरा कायम राखण्यात येणार आहे. स्पर्धेतील ८० विजेत्या बालकांची निवड आयुष्यभर शिक्षण आणि निवासी प्रायोजकत्वासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या झगमगाटानंतरही त्यांच्या भविष्याची काळजी संस्थेकडून घेतली जाईल.
या उपक्रमाला महिला व बालविकास विभाग, डी. वाय. पाटील विद्यापीठ (स्थळ भागीदार), सिल्वरराईज ग्रुप चेयरमन श्री. संतोष बारणे, मोनिजी एंटरप्रायझेस (आतिथ्य भागीदार), श्रीगोपाल रामनाथ धूत फाउंडेशन आणि एसएनजे एंटरप्राइजेस (मुद्रण भागीदार) यांचे सहकार्य लाभले आहे.
“हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार” ही स्पर्धा केवळ प्रतिभेचा शोध नाही, तर सृजनशीलता, आत्मविश्वास आणि संवेदनशीलतेचा उत्सव आहे. प्रशिक्षण शिबिरे, मेंटॉरशिप सेशन्स आणि प्रेरक सत्रांद्वारे या बालकांना त्यांच्या क्षमतेचा शोध घेण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळते. संस्थेच्या “Spreading Smiles Miles & Miles” या तत्त्वज्ञानाला अनुसरून हा ग्रँड फिनाले एक स्पर्धा नसून, समान संधी आणि प्रोत्साहनाच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या आंदोलनाचा भाग ठरणार आहे.








